एकता दौड मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
रांजणगाव पोलिसांचा उपक्रम कौतुकास्पद
रांजणगाव गणपती | ( साहेबराव लोखंडे)
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रांजणगाव MIDC (ता. शिरूर, जि. पुणे) पोलिस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (दि. 31 ऑक्टोबर) सकाळी “#Run for Unity – #Ekta Divas” या घोषवाक्याखाली एकता दौड मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
सकाळी सहा ते आठ या वेळेत पार पडलेल्या या मॅरेथॉनला शालेय विद्यार्थी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायत प्रतिनिधी, माजी सैनिक संघटना सदस्य, पोलीस मित्र आणि पत्रकार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुमारे 450 ते 500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेत 2, 3 आणि 5 कि.मी. अशा तीन गटांमध्ये स्पर्धा झाली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. शेवटी सर्वांनी “राष्ट्रीय एकतेची शपथ” घेतली आणि राष्ट्रगीताने या उपक्रमाची सांगता झाली.
“एकतेचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा या मॅरेथॉनचा हेतू आहे.”
– – महादेव वाघमोडे, पोलिस निरीक्षक, रांजणगाव MIDC