शांताई डेअरी ; गवळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर !
शांताई समूहाकडून तब्बल १ कोटी ८ लाखांचा दिवाळी बोनस
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दुग्धव्यवसायाला नवे बळ देणाऱ्या शांताई उद्योग समूहाने यंदा दिवाळी निमित्त दूध उत्पादक गवळ्यांना तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांचा बोनस वाटप करून अभूतपूर्व उदाहरण घालून दिले आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली आहे.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स डेअरीचे चेअरमन दिलीप सोदक यांच्या हस्ते बोनस वितरणाचा सोहळा पार पडला. या प्रसंगी संस्थेने अनाथाश्रमातील मुलांना दिवाळी फराळ आणि कपड्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
सन २०११ मध्ये फक्त २ हजार लिटर दूध संकलनाने सुरू झालेली शांताई डेअरी आज २८ हजार लिटर संकलनाचा टप्पा ओलांडून या भागातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकाभिमुख संस्था म्हणून नावारूपास आली आहे.

सध्या टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई, वडनेर, निमगाव दुडे, फाकटे, रावडेवाडी, शिरापूर या गावांमधून दूध संकलन होत असून, एकूण १३४९ दूध उत्पादकांना प्रति लिटर एक रुपया बोनस देण्यात आला आहे. यामध्ये रायचंद निवृत्ती काने या सभासदाला सर्वाधिक ₹६७,१५६ बोनस मिळाला. दिलीप सोदक यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना गायी खरेदीपासून पशुखाद्य घरपोच पुरवठ्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या वर्षी त्यांनी सुरू केलेल्या पशुखाद्य निर्मिती आणि सोयाबीन खरेदी-विक्री व्यवसायालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या सामाजिक व लोकाभिमुख उपक्रमामुळे शांताई समूहाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की —
“उद्योग म्हणजे फक्त नफा नव्हे, तर समाजाचा विकासही!”
“गरिबीची जाण ठेवून सर्वसामान्यांना सोबत घेत आम्ही यशाची शिखरे गाठली. या प्रवासात माझ्या पत्नी, मुलं, नातेवाईक आणि मित्रपरिवाराची साथ हेच माझं खरं बळ आहे.”
— दिलीप सोदक, चेअरमन, शांताई उद्योग समूह