जांबूतच्या थोरातवस्तीत बिबट्याचा हल्ला — ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू
आठ दिवसांत दुसरी मनुष्यहानी; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप
जांबुत | दि. २२ (प्रफुल्ल बोंबे)
शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा हैदोस सुरूच असून आठ दिवसांपूर्वी पिंपरखेड (ता. शिरूर) येथे पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा जांबुत (ता. शिरूर) येथे भयावह प्रकार घडला आहे.

आज बुधवार (दि. २२) रोजी पहाटे सहाच्या सुमारास थोरातवस्तीतील भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७२) या महिलेला बिबट्याने ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार, त्या सकाळी लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या असता घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याने त्यांना ओढत नेत सुमारे पाचशे फूट अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात ठार केले.
गेल्या आठ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यातील हा दुसरा मृत्यू असून परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. शिवन्या बोंबेच्या मृत्यूनंतर जुन्नरचे उपवनसंरक्षक संतोष खाडे यांनी शंभर पिंजरे लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात फक्त दहा पिंजरेच लावण्यात आले, त्यापैकी सातच कार्यरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे जांबुत, पिंपरखेड व पंचतळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात पंचतळे येथे सहा तास रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला.स्थानिकांच्या मते, या भागात सुमारे ३०० बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही वनविभागाकडून वेळेत ठोस उपाययोजना न झाल्याने या घटना घडत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
या परिसरात गेल्या काही वर्षांत मनुष्यहानीच्या आठ घटना घडल्या असून, प्रत्येक वेळी ग्रामस्थांनी सुरक्षिततेसाठी पिंजरे वाढविण्याची मागणी केली आहे. परंतु वनविभागाने ती मागणी दुर्लक्षित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वनविभागाकडून केवळ बैठका, घोषणाबाजी आणि कागदावरील आकडेवारी दाखविली जात आहे; प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात पथकांची उपस्थिती नगण्य आहे. शंभर पिंजरे लावण्याचे आदेश दिल्यानंतरही फक्त दहा कार्यान्वित असणे हा कारभारातील ढिसाळपणा आणि उदासीनतेचा पुरावा आहे.
बिबट्यांचा वाढता वावर, सततची मनुष्यहानी आणि भीतीने जगणारा शेतकरी वर्ग — हे दृश्य “मनुष्य आणि वन्यजीव सहअस्तित्वा”च्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उभे करीत आहे.शिरूर तालुक्यातील हा प्रश्न ‘वन्यजीव दहशत’ बनला असून यावर ठोस उपाय योजना राबविणे अत्यावश्यक आहे. “योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या, तर आज दोन निष्पाप जीव वाचले असते,” अशी संतप्त प्रतिक्रिया जांबुत परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.