बेल्हे–राळेगण थेरपाळ रस्ता निकृष्ट दर्जाचा ; ठेकेदाराला पेमेंट थांबवावे – ग्रामस्थांची मागणी
राळेगण थेरपाळ / प्रतिनिधी
बेल्हे ते राळेगण थेरपाळ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७६१ वरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. चांगल्या दर्जाचा मुरुम न वापरता सर्रास काळ्या मातीचा वापर, वाळूऐवजी ओढ्याची निकृष्ट वाळू वापरणे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी रुंदीकरण न करता भेदभावाने काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे काम तातडीने थांबवून ठेकेदाराला पेमेंट अदा करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात लवकरच तालुक्यातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींचे संयुक्त शिष्टमंडळ केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या महामार्गासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारकडून तब्बल ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे काम अत्यंत हलगर्जीपणे पार पडत असल्याचा आरोप होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही प्रभावशाली व्यक्तींच्या दबावामुळे ठिकठिकाणी रस्ता अरुंद ठेवण्यात आला असून, गोरगरिबांच्या जमिनींवर मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली जेसीबी चालवून आवश्यकतेपेक्षा जास्त रुंदीकरण करण्यात येत आहे. यामुळे जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्यास ३२५ कोटी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सर्रास काळी माती वापरल्याने रस्ता तयार झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत खड्डे पडतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कामात चांगल्या दर्जाचा मुरुम व वाळू न वापरता चुनखडीयुक्त काळी माती आणि ओढ्याची निकृष्ट वाळू वापरली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे काम एका दिल्लीस्थित मंत्र्यांच्या नातेवाईकाकडे असल्याची चर्चा सुरू असून, निकृष्ट दर्जामुळे काही महिन्यांत रस्ता खराब होऊन सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाणार का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.