मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
महसूल कार्यालय ‘कमाईचे केंद्र’ बनले ! ... नागरिकांचा आरोप
टाकळी हाजी |
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी महसूल मंडळात सध्या नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. मंडल अधिकाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, लाच दिल्याशिवाय कुठलेही काम होत नसल्याचा थेट आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. शासनाचा पगार घेणारे हे अधिकारी जनसेवेऐवजी स्वार्थसिद्धीसाठीच काम करत असल्याची नागरिकांची भावना आहे.
सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंदी, जात प्रमाणपत्र अशा महत्वाच्या कामांसाठी नागरिकांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. शासनाने प्रत्येक कामासाठी वेळमर्यादा ठरवून दिलेली असताना, ती पाळली जात नसल्याने कामं आठवड्यानंत किंवा महिन्याभराने होतात. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारीनुसार, मंडल अधिकाऱ्यांकडून “लक्ष्मी दर्शन” न झाल्यास फाईलवर सही होत नाही. लाच देणे हे जणू बंधनकारक बनले आहे. “काम करायचं असेल तर पैसे द्या, नाहीतर पुन्हा या”, असेच उत्तर वारंवार दिले जाते, अशी बोचरी टीका स्थानिकांनी केली आहे.
शासनाकडून ऑनलाईन सेवा, डिजिटायझेशन, वेळेचे बंधन असे उपक्रम राबवले जात असताना, मंडल अधिकाऱ्यांची ही दांडगाई लोकशाही व्यवस्थेची थट्टा ठरत आहे. विशेषतः टाकळी हाजी परिसरातील मंडल अधिकारी यांच्याविरोधात अधिक प्रमाणात तक्रारी होत असून, त्यांनीच कार्यालय ‘कमाईचे साधन’ बनवल्याचा आरोप आहे.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच!
जनतेचा उद्रेक टाळायचा असेल तर महसूल विभागातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तातडीची आणि ठोस पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, “जनतेच्या सहनशीलतेचा अंत जवळ आलाय!” असे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
तहसीलदार यांची भूमिका महत्त्वाची!
या पार्श्वभूमीवर स्थानिक तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. संबंधित मंडल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती प्रशासनात्मक कारवाई केली जाणार का? हा सध्या सर्वांचा प्रश्न आहे.