ऋतुजा राजगे प्रकरणाच्या निषेधार्थ शिरूरमध्ये भव्य मोर्चा
आमदार महेश लांडगे यांची धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी
शिरूर : (साहेबराव लोखंडे)
सांगलीतील यशवंत नगर येथील ऋतुजा सुकुमार राजगे या उच्चशिक्षित विवाहित महिलेने सासरच्या धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर शहरात समस्त सकल हिंदू समाज शिरूर – पुणे ग्रामीण यांच्या वतीने शनिवारी ( दि. २८ जून) भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा शिरूर बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झाला. महिलांनी अग्रभागी सहभाग घेतलेल्या या मोर्चामध्ये हातात विविध फलक, छत्रपती शिवाजी महाराज व ऋतुजा राजगे यांच्या प्रतिमा घेऊन घोषणा दिल्या गेल्या. “धर्मांतर विरोधी कायदा करा”, “प्राण सोडला पण धर्म नाही सोडला”, “हिंदूचे धर्मांतर थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चा जुना पुणे- अहिल्यानगर रस्त्याने, बसस्थानक मार्गे शिरूर तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे झालेल्या सभेत आमदार महेश लांडगे, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. महेश लांडगे म्हणाले, “ऋतुजा राजगे हिला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर जनजागृती केली जाईल. शिरूर तालुक्यातही धर्मांतराच्या घटना घडल्या आहेत. येथील अनधिकृत चर्च तीन महिन्यांत पाडावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच विधानसभेच्या आगामी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.”
वर्षाताई डहाळे म्हणाल्या, “ऋतुजाने प्राण सोडला पण धर्म नाही सोडला. महिला आयोगाने अद्यापही या प्रकरणात कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी समाजाला जागरूक होण्याचे आवाहन केले.”
ह.भ.प. संग्राम भंडारे यांनी सर्व हिंदूंनी संघटित होऊन वज्रमूठ बांधावी आणि धर्म रक्षणासाठी लढा उभारावा असे आवाहन केले.
या वेळी नानाजी पडळकर यांनीही धर्मांतरविरोधी कायदा अनिवार्य असल्याचे मत व्यक्त करत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. शिरूरचे विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रमुख मागण्या :
ऋतुजा राजगे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई.
राज्यात तात्काळ धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा.
शिरूर तालुक्यातील अनधिकृत चर्च हटवावीत.
महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी.