ग्रामपंचायत टाकळी हाजी येथे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
टाकळी हाजी |
पुणे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच टाकळी हाजी (ता. शिरूर) ग्रामपंचायत कार्यालयात संघाचे अध्यक्ष व्ही. एस. वायकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. सचिव सी. एम. बनसोडे यांनी सचिवीय कामकाज पाहिले.
या सभेला जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समितीतील सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पशुवैद्यकीय कर्मचारी तसेच अंगणवाडी सुपरवायझर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, सेवा विषयक समस्या आणि शासकीय निर्णयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सचिव बनसोडे यांनी विविध शासकीय निर्णय, शासन आदेश (जी.आर.) यांचे वाचन करून त्याबाबत सखोल माहिती दिली.
सभेमध्ये विशेषतः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी फॅमिली पेन्शनशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडून योग्य ते मार्गदर्शन मिळवले. तसेच, टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी नियोजन करत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती पुरवली.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष एम.डी. थिटे, खजिनदार जी.डी. आझादे, संघाचे कार्यकारणी सदस्य तसेच टाकळी हाजीचे ग्रामपंचायत सदस्य भरत खामकर, राहुल रसाळ, शौकत मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते.
ही सभा कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरली असून, भविष्यात अशाच प्रकारे सातत्याने चर्चासत्रांचे आयोजन करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.