घरगुती व प्रापंचिक वादातून झोपडी पेटविली
टाकळी हाजी |
भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात पतीने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी ( दि.१४) रात्री टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे घडल्याने जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत उषा संतोष पवार (वय २७) यांनी शिरूर पोलिसांत पती संतोष वसंत पवार याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मूळचे अ.नगर जिल्ह्यातील बोटा येथील रहिवासी असलेले पवार कुटुंब उदरनिर्वाहासाठी टाकळी हाजी येथील शिनगरवाडी जवळ राहत आहे. सायंकाळी जेवण करत असताना उषा हिने माझ्या सोबत मजुरीच्या कामाला चला असे म्हटल्याचा राग पती संतोषला आल्याने त्याने स्वतःचीच झोपडी पेटवून दिली.
आगीमध्ये घरातील सर्व साहित्याची राखरांगोळी झाली
झोपडी पेटल्यानंतर शेजाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. शेजाऱ्यांनी याबाबत माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना कळविताच ते तात्काळ पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिस आल्याची चाहुल लागतच संतोष तेथून पसार झाला.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कारंडे करीत आहेत.
पतीला दारूचे व्यसन असल्याने वारंवार त्रास देत आहे. आज ना उद्या सुधारेल या आशेवर आजवर आवाज उठविला नाही. स्वतःच्या कष्टाने मुलीचे लग्न केले असून मुलगा आश्रमशाळेत शिकत आहे. दररोज मीच कामाला जायचे,संतोष हा मात्र फक्त दारु पिऊन घरी गोंधळ घालत असतो. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांत तक्रार द्यावी लागली.असे उषा पवार यांनी सांगितले.