…अन् साविञीने त्याच्या देहात प्राण फुंकला!
संगिता सुनील शेळके यांनी पतीसाठी दिली स्वतःची किडनी
निमोणे | बापू जाधव
सगळं काही सुरुळीत सुरु होते ..गावगाड्यात त्या कुटुंबाला मानपान होता..आर्थिकदृष्ट्या ते कुटुंब सधन प्रवर्गात मोडत होते..घरचा कर्ता म्हणून त्याचा सगळीकडे बोलबाला होता. माञ नियतीची या हसत्या खेळत्या कुटुंबाला दृष्ट लागली , एका बेसावध क्षणी त्याला असाध्य आजाराने गाठले ..दिवसेंदिवस तो खंगत चालला. पुणे , मुंबई , दक्षिण भारतातील नामांकित दवाखान्यात त्याच्या वर शर्तीचे उपचार सुरु झाले.दोन्ही किडन्या निकामी झालेल्या त्या सत्यवाना साठी त्याची साविञी धावून आली आणि साक्षात यमालाही तीने माघार घ्यायला लावली.
एखाद्या चिञपटाची कथा शोभावी अशीच घटना पारगाव (ता.दौंड) येथील सुनिल शिवाजीराव शेळके यांच्या आयुष्यात घडली. सर्व अर्थाने सुस्थितीत असणाऱ्या या कुटुंबावर मागील सहा वर्षापासून नियतीचे वक्र दृष्टी फिरली. दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे सुनिल हे गंभीर आजारी पडले. प्रगतशिल बागायदार , प्रसिध्द आडत व्यापारी असा लौकिक असलेल्या शेळके यांच्या वर उपचार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी शर्थीचे प्रयत्न केले, माञ दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती ..अशा बिकट प्रसंगी त्यांची पत्नी संगिता सुनिल शेळके यांनी पुढाकार घेऊन स्वतःची किडनी आपल्या पतीला देऊन त्यांना पुनर्जीवन दिले.
असाध्य आजारावर मात करुन पुन्हा सामान्य आयुष्य जगणाऱ्या सुनिल शेळके यांची निमोणे येथील नागेश्वर मंदिरात त्यांचे मामा व निमोणे गावचे जेष्ठ नेते बबनराव ढोरजकर, अशोक ढोरजकर यांनी पेढे तुला केली. या वेळी ह.भ.प नारायण महाराज जाधव यांचे प्रवचन झाले. यावेळी माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, विजय भोस , नानासाहेब काळे ,आप्पासाहेब काळे , राहूल पवार , दत्ताञय जाधव , प्रल्हाद काळे , सतिश गव्हाणे , जयसिंग जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य शामकांत ढोरजकर , निवृत्त मेजर आनंदराव ढोरजकर , सोन्याबापू काळे आदी मान्यवर उपस्थित होते.