दामुशेठ घोडे आदर्श पुरस्काराने सन्मानित..
टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील माजी सरपंच दामुशेठ धोंडीबा घोडे यांना संजीवनी शेती व शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा,सांस्कृतिक, उद्योग,व्यवसाय अशा क्षेत्रामधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील गुनिजन व्यक्तींचा अभ्यास करून राज्यस्तरीय शिवछत्रपती संजीवनी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन २०२२ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संगमनेर येथे एकवीरा फाऊंडेशन च्या संस्थापिका जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व दिपकृष्ण ग्रामीण सहकारी बँकेचे अध्यक्ष समाजश्री दिपक दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी संस्थेचे सर्व सहकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
दामुशेठ घोडे यांनी दहा वर्षे तर त्यांची पत्नी अरुणाताई यांनी पाच वर्षे असे सलग पंधरा वर्षे या जोडीने टाकळी हाजी चे सरपंच पद भुषविताना अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनसामान्यांच्या प्रश्र्नाबरोबर गावच्या विकासात तसेच परिसरात भरीव योगदान दिले आहे.
गोरगरीब जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता, सर्वसमावेशक, सर्वांच्या सुख-दुःखात अग्रभागी राहून समाजहित जपत असताना स्वतःच्या खिशाला झळ घेऊन गरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा एक दानशूर नेता अशी ओळख असताना त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे त्यांच्या पुढील कार्यास नक्कीच चालना मिळत राहिल.
….
गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असून या पुरस्कारामुळे माझी समाजाप्रती जबाबदारी वाढली आहे.
…….. दामुशेठ घोडे .. आदर्श सरपंच,टाकळी हाजी