वनविभाग कर्मचारी विठ्ठल भुजबळ सेवानिवृत्त
टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील बेट भागातील सर्वसामन्यांना हक्काचा माणूस म्हणून सहज उपलब्ध होणारे आणि विशेष करून बिबट्याच्या हल्ल्यांनंतर शेतकऱ्यांच्या हाकेला लगेच धावत येणारे चांडोह (ता.शिरूर) येथील विठ्ठल भुजबळ हे बुधवारी (दि.३१) वनविभागाच्या सेवेतून निवृत्त झाले . सन १९८४ पासून ते वनविभागात वनसेवक म्हणून काम करत असल्यामुळे पश्चिमेकडील सर्व गावांतील लोकांचा त्यांच्याशी निकटचा संपर्क होता. शेतकऱ्यांना पशुधन नुकसान भरपाई मिळून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
भुजबळ यांच्या सेवा पूर्ती निमित्त शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी कार्यालयाच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत भुजबळ यांचा सन्मान करून त्यांना पुढील आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वनसेवक म्हणून त्यांनी वन संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली असे म्हसेकर यांनी सांगितले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल गणेश पवार, गौरी हिंगणे ,वनरक्षक ऋषिकेश लाड,लहू केसकर,वनमजूर पाचुंदकर, बाळू पडवळ आदी उपस्थित होते.
वनसेवक म्हणून विठ्ठल भुजबळ यांनी वन संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली..
….मनोहर म्हसेकर , वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर