माळवाडी येथे बिबट्या जेरबंद..

घरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर लावला होता पिंजरा

0

 

टाकळी हाजी : वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील गणेश सिताराम भाकरे यांच्या घरासमोर अवघ्या शंभर मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी ( दि.२२) मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला.

माळवाडी चे ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भाकरे हे रात्री शेताला पाणी देत असताना बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने जावून पाहिले असता तो आवाज बिबट्या साठी लावलेल्या पिंजऱ्याचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्यामुळे त्यांनीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करून तिथे पिंजरा लावला होता.

पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी माळवाडी चे सरपंच सोमनाथ भाकरे यांना कळविताच त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली.त्यांनी सकाळी वनविभाग येवुन पिंजरा घेवून जातील असे सांगितले. बिबट्या जेरबंद झाला ,परंतु पिंजऱ्यात असलेले प्लायवूड बिबट्याने पंज्याने तोडले त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेले सरपंच सोमनाथ भाकरे यांनी ही माहिती वनरक्षक लहू केसकर यांना कळविताच ते त्यांच्या एका सहकाऱ्यासह गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

या बिबट्याला माणिकडोह येथील जंगलात सोडणार असल्याचे केसकर यांनी सांगितले असले तरी तुम्ही खरेच कुठे सोडता याची आम्हाला खात्री करून घ्यायची आहे ,त्यामुळे आम्ही मात्र तुमच्या गाडीमागे येणार आहोत अशी भावना तेथे जमलेल्या स्थानिकांनी व्यक्त केली.

तब्बल पंधरा दिवसांनी बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे तूर्तास जरी भीती कमी झाली असली तरी या भागात अजून बिबट्या असण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी येथील रहिवासी यांच्याकडून होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.