शिरूर | (साहेबराव लोखंडे)
मीना शाखा कालव्यावरील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जलसंपदा विभागाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात घोड व कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश हनुमंत वायसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्रालयात जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
मीना शाखा कालव्यावरील सुमारे २८ पाणी वापर संस्थांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याची गंभीर समस्या यावेळी मांडण्यात आली. कालव्याचे अस्तरीकरण, अनेक ठिकाणी भराव, टेल डी-वाय लायनिंगची तातडीची गरज, तसेच १०० पेक्षा अधिक गेट्सची दुरुस्ती याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले.
याशिवाय डी.वाय-१ व डी.वाय-२ कालव्यांची वहन क्षमता वाढविणे, गळती रोखणे, अतिक्रमण हटविणे, तसेच पाणी वापर संस्थांना कोट्यानुसार पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. भूसंपादन व मोबदला प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना होत असलेल्या नुकसानीचाही मुद्दा मांडण्यात आला.
या सर्व बाबींवर सचिव डॉ. बेलसरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत ,संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. लवकरच याबाबत ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.या भेटीत मीना शाखा कालव्याच्या विविध पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.