शिरूर ग्रामीण रुग्णालयात वरीष्ठांची अचानक तपासणी

गंभीर त्रुटी उघड, कारवाईचे संकेत

0

शिरूर | सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर व वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती , यावेळी आरोग्य सेवेशी संबंधित अनेक गंभीर व धक्कादायक त्रुटी समोर आल्या आहेत.यामध्ये रुग्णांच्या वापरातील बेडशीट अस्वच्छ व नियमानुसार नसणे,रुग्णालय परिसरात, वॉर्ड व शौचालयांमध्ये स्वच्छतेचा पूर्ण अभाव,ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक असतानाही रुग्ण भरतीचे प्रमाण संशयास्पदरीत्या कमी,जिल्हा स्तरावरून उपलब्ध असलेली औषधे वेळेवर उचलून रुग्णालयात न आणणे, त्यामुळे रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नसणे या गंभीर त्रुटींमुळे ग्रामीण व गरीब रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, औषधे व निधीचा योग्य वापर न झाल्यास ग्रामीण व गरीब रुग्णांचे आरोग्य गंभीर धोक्यात येणार आहे. रुग्णांच्या गैरसोयीसाठी रुग्णालयातील एक डॉक्टर जबाबदार असल्याची चर्चा असून, तो जबाबदार डॉक्टर कोण आहे व त्याला पाठीशी घालणारा आका कोण आहे, याची सखोल चौकशी करून उचित कारवाई करण्यात यावी.अन्यथा सामाजिक हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन, व कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी यावेळी दिला आहे.

“शिरूर ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता, औषध उपलब्धता व रुग्णसेवा या मूलभूत बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या बाबी अत्यंत गंभीर असून संबंधितांना तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येईल.”
डॉ. नागनाथ यमपल्ले-जिल्हा शल्य चिकित्सक

“ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अत्यंत गंभीर आहे. बेडशीट अस्वच्छ, स्वच्छतेचा अभाव, औषधांची टंचाई व रुग्ण भरती कमी असणे , खराब/तुटलेले नळ व बेसींग- ही थेट जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे. ग्रामीण रुग्णालयातील काही डॉ व काही कर्मचारी कसोटीने काम करताना आढळतात परंतु अपुऱ्या सुविधांमुळे ते हतबल दिसतात.त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली दंतचिकित्सकासाठी आवश्यक साहित्याची तातडीने पूर्तता करण्यात यावी.”
निलेश मंदा यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.