टाकळी हाजी | सत्यशोध प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शनिवारी (दि. १०) मुंबई येथील शिवसेना भवनात हा पक्षप्रवेश सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
दादर येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार तथा माजी मंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते डांगे यांना शिवबंधन बांधून शिवसेनेची मशाल देण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, माजी महापौर विशाखाताई राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षप्रवेशप्रसंगी उपस्थित शिवसेना नेत्यांनी बाळासाहेब डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे जंगी स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, महाराष्ट्र वितरक सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख जुन्नर–आंबेगाव दिलीप बाम्हणे, उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख, तालुका प्रमुख ॲड. भोलेनाथ पडवळ, गणेश जामदार, युवासेना जिल्हाप्रमुख संदीप शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन वागदरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मिर्लेकर आणि विशाखाताई राऊत यांनी बाळासाहेब डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत शिवसेनेतून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.