साधना नरसाळे यांचा पुणे महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ गौरव
ज्ञानातून संस्कार, संस्कारातून घडली पिढी
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे, या तत्त्वाशी निष्ठा राखत कार्यरत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या रामचंद्र आप्पा बनकर विद्यालयातील आदर्श शिक्षिका साधना बन्सी नरसाळे यांना पुणे महानगरपालिकेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
२०१० पासून अध्यापन क्षेत्रात अखंडितपणे कार्यरत असलेल्या नरसाळे यांनी अध्यापन ही केवळ नोकरी नसून एक सामाजिक जबाबदारी असल्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरले असून, एका विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावत शाळेचे व पुणे महापालिकेचे नाव उज्ज्वल केले.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच शाळेच्या एकूण प्रगतीतही त्यांचा मोठा वाटा आहे. शाळेला आयएसओ मानांकन तसेच ‘स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धा २०२५-२६’ मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देणे, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढवणे, मूल्यसंस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास रुजविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आदर्श ठरले आहेत.
विशेष म्हणजे, साधना नरसाळे या मूळच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील असून त्यांचे पती शिवाजी बबन गावडे हे सुद्धा पुणे महानगरपालिकेत आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दोघांचा सन्मान हा टाकळी हाजी गावकऱ्यांसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.
हा पुरस्कार समारंभ वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त चंद्रन सर, उपायुक्त विजयकुमार थोरात व शिक्षण उपसंचालक सुनंदा वाखारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
साधना नरसाळे यांचा हा सन्मान केवळ त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव नसून इतर शिक्षकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारा आहे.