शिरुर तालुक्यातील आठ कुटुंबांची ५५ लाखांची फसवणूक

ठेकेदार फरार - नागरिकांची कठोर कारवाईची मागणी

0

टाकळी हाजी |

शिरूर तालुक्यातील मलठण, वरुडे व निमगाव दुडे येथील एकूण आठ कुटुंबांची घरबांधणीच्या नावाखाली तब्बल ५५ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, संबंधित ठेकेदारांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

फसवणूक करणारे नाशिक जिल्ह्यातील कंत्राटदार
तक्रारदारांच्या माहितीनुसार, वैजनाथ मोहिते, अजय पवार, नामदेव पवार आणि मोहन चव्हाण हे चौघे नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता. निफाड) गावचे रहिवासी असून, त्यांनी शिरूर तालुक्यातील गावांमध्ये आठ ते नऊ महिने वास्तव्य केले. या काळात त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून घरबांधणीची कामे स्वीकारली. सुरुवातीला काही घरांचे बांधकाम सुरू केले, मात्र काही महिन्यांनंतर ही कामे अर्धवट सोडून आरोपी गावातून फरार झाले. त्यांनी रोख व ऑनलाइन स्वरूपात लाखो रुपयांची रक्कम स्वीकारली होती.

फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये भानुदास थोरात – १३.५० लाख , खंडू शिंगाडे – १३ लाख , म्हस्कू थोरात – १२.१० लाख , अभिमन्यू बारहाते – ८. ५० लाख ,, मंगल पानगे – ५ लाख, शंकर शिंदे – २.५० लाख , मंगल शिंगाडे – १.२० लाख याशिवाय, मंगेश फुलसुंदर यांच्याकडून ६०हजारांची खडी क्रशर खरेदी केली असून त्यांचेही बिल दिलेले नाही.

फसवणुकीनंतर भानुदास थोरात हे कंत्राटदांच्या मूळ गावी नैताळे येथे गेले असता, त्यांना धमकावण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात गंभीरता अधिक वाढली आहे.

पुराव्यांसह तक्रार दाखल, अद्याप कारवाई नाही 

दि. ३१ मार्च २०२५ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदारांनी अर्धवट बांधलेल्या घरांचे फोटो, बँक स्टेटमेंट व ऑनलाइन व्यवहारांचे पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने ४ एप्रिल रोजी पुन्हा एक अर्ज सादर करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवर संतापाची लाट
या प्रकारामुळे मलठण येथील शिंदेवाडी, वरुडे येथील शिंगाडवाडी व निमगाव दुडे परिसरात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. फसवणूक व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

पोलिसांकडून ठोस पावले उचलण्याची गरज :
अशा प्रकारे विश्वासघात करून लाखो रुपये उकळून पसार होणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर शिक्षा व कारवाईची गरज आहे, अन्यथा भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पीडितांना न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.