कुंड येथील रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
वाशिम जिल्ह्यातील एक महिला पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी ( दि.८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून पाण्यात पडली असून चोवीस तास उलटूनही तिचा शोध लागला नाही.
पद्माबाई शेषराव काकडे (रा.मोहगव्हाण ता. कारंजा, जि. वाशिम) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली. पाण्याच्या प्रवाहात काही अंतर वाहत गेली. मात्र तेथील खडकामध्ये रांजणाच्या आकाराचे मोठे मोठे खड्डे असल्याने ती कदाचित त्यामध्ये अडकली असावी असा प्रत्यक्ष दर्शींचा अंदाज आहे.
महीला पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले मात्र नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली.
सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेतली व महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले.औताडे यांना या रांजण खळगे परिसराचा अंदाज न आल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली असावी. त्यांना दुखापत झाली असून त्यांचाही जीव थोडक्यात बचावला आहे.असे तेथील प्रत्यक्षदर्शी बापू होणे यांनी सांगितले.
कुंड पर्यटन स्थळ पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी आणि नगर जिल्ह्यातील निघोज या गावांच्या सीमेवर असून निघोज बाजूकडून टाकळी हाजी हद्दीकडे येत असताना निघोज हद्दीत हा प्रकार घडला आहे.वाहत्या पाण्यामुळे शोध घेणे अवघड झाल्याने पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी
संपर्क साधला असून सर्वजण पाणी बंद होण्याची वाट पाहत आहेत.