टाकळी हाजी सोसायटी निवडणुकीच्या हालचालींना वेग..
अतिक्रमण धारकांना निवडणुकीत अडचण येण्याची शक्यता
टाकळी हाजी : वृत्तसेवा
टाकळी हाजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय गोटात वेगाने हालचाली घडत आहेत.
तेरा जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. फॉर्म माघारी घेण्याची मुदत जसजशी जवळ येत आहे तसे काही व्यक्तींकडून समोरच्या व्यक्तीचे फॉर्म बाद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यासाठी काही व्यक्तींनी न्यायालयात धाव घेतल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
तसेच प्रत्येक उमेदवार कसा अडचणीत येऊ शकतो हे त्या जागेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून शोधले जात आहे.
उमेदवार निवडून आला तरी तो अपात्र कसा होईल, असा निकष तपासण्यात अनेक जण व्यस्त आहेत. त्यामध्ये तीन अपत्य, उमेदवाराचे अतिक्रमण अशा विविध निकषांचा शोध गुप्तपणे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.या निवडणुकीमुळे एखाद्याच्या घरावर हातोडा पडू शकतो अशी शंका काही अनुभवी राजकीय व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी असा सर्वसामान्यांचा आग्रह आहे. येणाऱ्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. १३ मार्च रोजी माघारी तर निवडणूक २५ मार्च रोजी होणार आहे.