टाकळी हाजी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला
टाकळी हाजी ( दि.१)
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील कुंडलिक थोरात यांच्या शेळीवर बिबट्याने गुरुवारी ( दिनांक १) सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान हल्ला केला असून यामध्ये शेळी ठार झाली आहे.
विष्णु थोरात हे घरापासून जवळच शेळ्या चारत होते , अचानक उसाच्या शेतातून बिबट्याने शेळी वर झडप घेत शेळीला घेवून ऊसात पोबारा केला. थोरात यांनी आरडाओरडा करताच शेजारी तिकडे धावत आले परंतु त्यांना ऊसात शोध घेईपर्यंत बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले असता पंचनामा करण्यासाठी उद्या येऊ असे सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात बिबट्याच्या बछड्याचा उपासमारीने मृत्यू तसेच शिकार न मिळाल्यामुळे थेट मानव वस्तीतच प्रवेश करून पशुधनावर बिबट्याचे हल्ले अशा अनेक घटना घडूनही वनविभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे पुणे जिल्हा भा ज पा उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात यांनी सांगितले.
या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून महावितरण ने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज द्यावी , वनविभागाने तात्काळ पिंजरे लावावे, तसेच पशुधनावर हल्ले झाल्यानंतर तात्काळ पंचनामे व्हावेत अशी मागणी सरपंच अरुणाताई घोडे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई थोरात यांनी केली आहे.