कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे ‘होजरील तुषार सिंचन तंत्रज्ञान’ कार्यशाळा
शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
नारायणगाव | कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी “होजरील तुषार सिंचन तंत्रज्ञान” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ नारायणगाव आणि श्रीकृष्ण पाणी वापर संस्था क्र.२६ औरगंपुर/पारगाव यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इटलीच्या इरीमेक कंपनीचे निर्यात विभाग प्रमुख अड्रिया सलादिनी यांनी आधुनिक तुषार सिंचन पद्धतीचे सादरीकरण स्लाइड्स व व्हिडिओच्या माध्यमातून केले. त्यांच्या इंग्रजी मार्गदर्शनाचे मराठी भाषांतर डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी करत उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
पाणी आणि सिंचन क्षेत्रात चार दशकांचा अनुभव असणारे तज्ज्ञ सुरेश कुलकर्णी यांनी होजरील तुषार सिंचन तंत्रज्ञानाची सविस्तर मांडणी केली. यावेळी जलसंपदा विभागाचे निवृत्त महासंचालक दि. मा. मोरे आणि कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अनिल मेहेर यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रिमियर इरिगेशन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक राहुल आहेर यांनी ड्रिप आणि तुषार सिंचनातील प्रगत तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. इरीमेक कंपनीसोबत सहकार्य वाढवून अत्याधुनिक तुषार तंत्रज्ञान भारतातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत माहिती देण्यात आली.
उपस्थित शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात लवकरात लवकर उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व ऊस पिकांसाठी होजरील तुषार सिंचन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर यांनी पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी, सुभाष झिंजाड आणि उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांनी सूत्रसंचालन केले.
सदर कार्यक्रमानंतर मान्यवरांनी कुकडी लाभक्षेत्रातील कालवे व शेतांची पाहणी करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस विविध पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.