बैलगाडा शर्यतींच्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला मान–अभिमान, स्पर्धा, वैर आणि प्रेमाचा संगम असलेला ‘घाटातील मॅटर’ हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ग्रामीण संस्कृती, शेतकऱ्यांचे भावविश्व आणि बैलगाडा शौकिनांच्या जगण्याला भिडणारा हा लघुपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कथेचा गाभा आहे — सामान्य शेतकरी बैलगाडा मालक आबा आणि पैशाने व बळाने गाजणाऱ्या पाटील घराण्याचा संघर्ष. पाटील आबाच्या बैलावर फिदा होतो आणि त्याला आपल्या घाटात उतरवण्यासाठी पैशाचे आमिष दाखवतो. मात्र, आबा आपला मान राखत नकार देतो. यावरून पेटते दोन पिढ्यांतील वैर, अहंकाराचा संघर्ष आणि धमक्यांचा खेळ!
परंतु कथेला गोड कलाटणी मिळते, जेव्हा पाटलांच्या दोन्ही मुली आबाच्या मुलांच्या प्रेमात पडतात! वैराची कहाणी प्रेमकथेत रूपांतरित होते आणि शेवटी संपतो ‘घाटातील मॅटर’ सात फेऱ्यांमध्ये!
या लघुपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत खंडू भुकन, सचिन शिंदे, दिशा भोसले, मोहिनी शिंदे, मुकेश राऊळकर, रमेश खाडे आणि निळूभाऊ चोरे यांनी. ग्रामीण जीवनाचे वास्तव टिपणारा हा भावस्पर्शी आणि रोमहर्षक लघुपट निळूभाऊ चोरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला असून, कॅमेरामन संदीप शेटे यांनी छायांकन केले आहे. निर्माता देखील निळूभाऊ चोरे आहेत.
‘घाटातील मॅटर’ – प्रेम, प्रतिष्ठा आणि बैलांच्या मॅटरची खरी गोष्ट!
लवकरच प्रदर्शित होणारा हा लघुपट बैलगाडा शौकिनांसाठी आणि ग्रामीण जीवनावर प्रेम करणाऱ्यांसाठी एक दृश्य मेजवानी ठरणार आहे.