पाणी वापर संस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन
कुकडी पाटबंधारे विभागात बैठक, विविध तांत्रिक विषयांवर चर्चा
नारायणगाव : कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १, नारायणगाव येथे नुकतेच कार्यभार स्वीकारलेल्या कार्यकारी अभियंता गणपत नान्नोर यांची शिवनेरी वितरीका स्तरावरील पाणी वापर संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन कुकडी प्रकल्पाशी संबंधित विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
या चर्चेत ११३ लघु वितरीका स्तरावरील पाणी वापर संस्थांच्या अडचणी, संस्थांचे कार्यालय बांधकाम, अतिक्रमण, “एक कर्मचारी–एक संस्था” धोरण, बंद पाईपलाइन योजना, प्रोत्साहनपर अनुदान, गेट दुरुस्ती, महत्त्वाची कामे तसेच को.प. बंधाऱ्यांवर स्वयंचलित गेट बसविणे या विषयांचा समावेश होता.
अभियंता नान्नोर यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अधिसूचित क्षेत्रातील पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांना पाण्यावरील आपला हक्क अबाधित ठेवण्यासाठी वेळेत मागणी करावी आणि जलसंपदा विभागास पाणीपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन केले.
या वेळी शिवनेरी वितरीका स्तरावरील पाणी वापर संस्था महासंघाचे अध्यक्ष सुभाष झिंजाड, उपविभागीय अधिकारी तान्हाजी खाडे, दत्तात्रय कोकणे, रविंद्र हांडे, कार्यकारी संचालक विश्वनाथ येवले, उपाध्यक्ष दिलीप मदगे, संचालक संतोष मोरे, अरुण तांबोळी, शिवाजी डेरे, पाडुरंग ढवळे, लहू भाकरे, विकास मिंडे, रवि तांबोळी, अरुण सोमवंशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.