प्राथमिक शिक्षणात ए.आय. : काळाची गरज

श्री. पोपट धोंडीभाऊ भालेराव उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरखेड

0

 

सत्यशोध वृत्तसेवा 

मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान झाले आहे. तंत्रज्ञानाशिवाय जीवन जगणे सुसह्य होणे अशक्यप्राय झाले आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेनुसार, जुलै महिन्यात ChatGPT या ए.आय. प्रणालीवर दररोज सुमारे 2.5 अब्ज प्रश्न विचारले गेले. गुगल किंवा इतर सर्च इंजिन्सवर माहितीचा महाकाय स्रोत उपलब्ध असला, तरी त्यामध्ये मर्यादा जाणवतात. त्यांची विश्वसनीयता किंवा अचूकता प्रत्येक वेळी निश्चित नसते.

तंत्रज्ञान जसे वैद्यकीय, औद्योगिक, आर्थिक, कृषी अशा सर्वच क्षेत्रात उपयोगी ठरते, तसेच शिक्षणक्षेत्रही त्यापासून दूर राहू शकत नाही. उच्च शिक्षण क्षेत्रात ए.आय.चा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र प्राथमिक शिक्षण – विशेषतः सरकारी प्राथमिक शाळा – या प्रवाहापासून अजूनही बऱ्याच अंशी दूर असल्याचे दिसते.

संसाधनांची कमतरता, तंत्रज्ञान वापरण्याबाबत अनभिज्ञता, व ग्रामीण भागातील मर्यादा यामुळे प्राथमिक शिक्षणात ए.आय.चा पुरेसा वापर होत नाही. तरीही, आजघडीला काही प्रमाणात शाळा, शिक्षक व विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, हे निश्चितच आशादायक चित्र आहे.

ChatGPT, Gemini, Perplexity यांसारखी शेकडो ॲप्स प्लेस्टोअरवर अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत. आजचा विद्यार्थी तंत्रज्ञान वापरणे सहज शिकतो व त्यावर आधारित शिक्षण अधिक प्रभावी वाटते. ए.आय.च्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे फायदे होऊ शकतात:


विद्यार्थ्यांना होणारे फायदे:

  • अध्ययन करताना येणाऱ्या शंका विद्यार्थ्यांना त्वरित सोडवता येतात.
  • अनेक विद्यार्थी शिक्षकांसमोर संकोचाने शंका विचारत नाहीत; अशा वेळी ए.आय. हे उत्तम मार्गदर्शन करू शकते.
  • विद्यार्थी आपली गती आणि वेळेनुसार अध्ययन करू शकतात.
  • समज न झालेल्या संकल्पनांचे स्पष्ट स्पष्टीकरण मिळाल्यामुळे आकलन क्षमता वाढते.
  • शिक्षण अधिक मनोरंजक बनते; कारण व्हिज्युअल माध्यमांतून माहिती समजते.
  • विद्यार्थ्यांना मातृभाषेतून प्रॉम्प्ट देणे शक्य असल्याने शिक्षण सहज होते.
  • स्मार्टफोन जवळपास प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असल्याने ए.आय.चा उपयोग सोपा झाला आहे.
  • सर्व विषयांवरील चाचण्या स्वतः तयार करून सोडवल्यामुळे स्वयंमूल्यमापन शक्य झाले आहे.

शिक्षकांना होणारे फायदे:

  • शाळाबाह्य कामांमुळे अध्यापनासाठी वेळ कमी मिळतो, अशा वेळी ए.आय. उपयुक्त ठरते.
  • स्वाध्याय पत्रिका, चाचण्या, मासिक आणि वार्षिक नियोजन काही सेकंदांत तयार होते.
  • अध्यापनासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य निर्माण करणे सोपे होते.
  • विविध संदर्भ, दुवे सहज मिळाल्यामुळे अध्यापन अधिक प्रभावी होते.
  • क्विझ, उपक्रम तयार करून विद्यार्थ्यांना अध्ययनप्रवृत्त करता येते.
  • विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा डेटा उपलब्ध झाल्यामुळे उपचारात्मक अध्यापन शक्य होते.
  • विविध ए.आय. ॲप्समुळे अध्यापन मनोरंजक व प्रभावी होते.

संभाव्य अडचणी व धोके:

  • ए.आय.चा वापर जरी फायदेशीर असला, तरी अतिरेक टाळणे गरजेचे आहे.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार करण्याचा स्वभाव कमी होण्याची शक्यता असते.
  • मेहनत न करता माहिती मिळाल्यामुळे आळशीपणा वाढण्याचा धोका संभवतो.
  • त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रबोधन देणे आवश्यक आहे.
  • तंत्रज्ञान ही एक दुधारी तलवार आहे – त्याचा सद्सदविवेकाने वापर करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

निष्कर्ष:
प्राथमिक शिक्षणात ए.आय.चा समावेश करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षकांचे अध्यापन अधिक प्रभावी बनवण्यासाठी ए.आय.चा योग्य वापर आवश्यक आहे. विवेकपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो.

✍️ लेखक:
श्री. पोपट धोंडीभाऊ भालेराव
उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरखेड

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.