घोडगंगा कारखान्यावर राष्ट्रवादी पुन्हा… अशोकबापू पवार सलग पाचव्यांदा … 

विरोधकांना फक्त एका जागेवर समाधान

0

 

टाकळी हाजी : प्रतिनिधी (दिनांक ७)

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत, आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने, भाजपसह विरोधी पक्षांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचा धुव्वा उडवत विजयश्री खेचून घेतली आहे.

वीस जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विरोधकांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार अशोकबापू पवार यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी पुन्हा चा नाद घुमला. २१ जागांपैकी ब गटातून ऋषिराज अशोकबापू पवार यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित वीस जागांसाठी रविवारी (दिनांक ६) ७१. ६६ टक्के मतदान झाले. एकूण साठ मतदान केंद्रांसाठीच्या साठ पेट्यांतील मतमोजणीला सकाळी नऊ वाजता सुरवात झाली. प्रत्यक्ष मतांची मोजणी दहा वाजता सुरू झाली.

या मतमोजणीचा पहिला निकाल दुपारी साडेअकरा वाजता जाहिर झाला. यात मांडवगण फराटा गटातून घोडगंगा दादा पाटील फराटे यांनी आघाडी घेतल्याने किसान क्रांती पॅनेलच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, हे वातावरण पुढच्या अर्धा तासातच बदलले आणि आमदार ॲड. अशोकबापू पवार यांनी त्यांच्या वडगाव रासाई गटातून तब्बल एक हजारावर मतांची आघाडी घेतल्याचे सिद्ध झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला.

मांडवगण गटातील दुसरी जागाही राष्ट्रवादीकडे गेल्याने कही खूशी कही गम असे चित्र उभे राहिले. त्यानंतर इनामगाव व वडगाव रासाई गटात शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी एकतर्फी आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली.

सर्वसाधारण गटांतील कल निश्चीत होताच आमदार ॲड. अशोकबापू पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘आमदार अशोकबापू पवार झिंदाबाद’ च्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडला. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करीत राष्ट्रवादी पुन्हा या गीतावर अनेक कार्यकर्ते थिरकले.

भाजप व विरोधकांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील यांनी विजयी सलामी दिली. तेथील शेतकरी विकास पॅनेलचे संभाजी शिवाजी फराटे यांनीही दणदणीत विजय मिळविला. किसान क्रांती चे बाळासाहेब माधवराव फराटे व शेतकरी विकास पॅनेल चे दिलीप आनंदराव फराटे यांना पराभव पत्करावा लागला.

इनामगाव गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. या पॅनेलच्या सचिन बाबासाहेब मचाले व नरेंद्र अण्णासाहेब माने यांनी नेत्रदीपक विजय संपादन केला. किसान क्रांती च्या तात्यासाहेब हौसराव घाडगे व मच्छिंद्र सोपान थोरात यांना पराभव पत्करावा लागला. विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या वडगाव रासाई गटात आमदार ॲड. अशोकबापू पवार यांनी सुमारे अडीच हजार मतांच्या फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. त्यांच्यासह शेतकरी पॅनेलचे दुसरे उमेदवार उमेश सुदाम साठे यांनीही आमदारांच्या पाठोपाठ विजय मिळविला. किसान क्रांती पॅनेलचे विरेंद्र दत्तात्रेय शेलार व सुभाष हनुमंत शेलार यांचा मोठा पराभव झाला.

न्हावरे गटात काही प्रमाणात चुरस दिसून आली. तेथे राष्ट्रवादीचे संजय ज्ञानदेव काळे, मानसिंग सिताराम कोरेकर व शरद मोहनराव निंबाळकर विजयी झाले. किसान क्रांती पॅनेलच्या अशोक वामन गारगोटे, पांडुरंग विठोबा दुर्गे व दत्तू कोंडीबा शेंडगे यांचा त्यांनी पराभव केला. मागील वेळी तळेगाव ढमढेरे गटाचा राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या विजयात मोलाचा वाटा होता. म्हणून या वेळी त्या गटातील निकालाबाबत उत्कंठा होती. तेथे किसन क्रांती पॅनेलला आशा लागून राहिल्या होत्या. मात्र, त्या आशा धूसर ठरवित शेतकरी पॅनेलने तीन्ही जागा मोठ्या फरकाने ताब्यात घेतल्या. या पॅनेलचे सोपान वाल्मिकराव गवारी, विश्वास रामकृष्ण ढमढेरे व पोपट रामदास भुजबळ हे विजयी तर किसान क्रांती पॅनेलचे महेश अरविंद ढमढेरे, आबासाहेब लक्ष्मण गव्हाणे व ॲड. सुरेश रामचंद्र पलांडे हे पराभूत झाले.

शिरूर गटातून विरोधी पॅनेलचे उमेदवार तूलनेने सरस होते. मात्र, तेथे वाल्मिकराव धोंडीबा कुरंदळे, सुहास नारायण थोरात व प्रभाकर तथा आबासाहेब नारायण पाचुंदकर यांना रिंगणात उतरवून राष्ट्रवादीने विजयी डंका वाजविला. येथून कारखान्याचे जुने माजी संचालक पांडुरंगअण्णा बळवंत थोरात, सावित्राशेठ विठोबा थोरात व अशोक धर्माजी माशेरे यांना अपयशाला सामोरे जावे लागले.

महिलांसाठीच्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीच्या मंगल सुहास कोंडे व वैशाली सुनिल जगताप यांनी किसान क्रांती च्या मंदाकिनी अंकुशराव नागवडे व सुवर्णाताई बिभीषण फराटे यांचा पराभव करून एकतर्फी विजय संपादन केला. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून किसान क्रांतीच्या शांताराम अण्णासाहेब कांबळे यांना हरवून शेतकरी पॅनेलचे उत्तम रामचंद्र सोनवणे विजयी झाले.

इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून राष्ट्रवादीच्या शिवाजी मुक्ताजी गदादे यांनी किसान क्रांती च्या राहुल संभाजी गवारे यांना हरविले. भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागास प्रवर्गातून विद्यमान संचालक बिरा बाबू शेंडगे यांनी किसान क्रांती च्या बाळासाहेब बाबा कोळपे यांना हरवून फेरविजय संपादन केला.

या विजयाबद्दल टाकळी हाजी चे माजी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, सरपंच अरूणा घोडे उपसरपंच गोविंद गावडे, दामुआण्णा घोडे प्रतिष्ठान चे म्हतारबा खाडे, सामाजिक कार्यकर्ते पोपटशेठ गावडे यांनी सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक दिग्विजय आहेर , व सहाय्यक शिरूरचे सहायक निबंधक शंकर कुंभार यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.