शिरूर | प्रतिनिधी
शिरूर तहसील कार्यालयात एका अपंग व्यक्तीस शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी राहुल शंकर करपे (रा. टाकळी भिमा) याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अशोक रावसाहेब भोरडे (वय 48, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी तहसील कार्यालय व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे अनधिकृत प्लॉटिंग संदर्भात लेखी तक्रार केली होती, आणि त्या अनुषंगाने दस्त नोंदणी थांबवण्यात आली होती. त्यामुळे चिडून, आरोपी करपे यांनी तहसीलदारांच्या केबिनमध्ये सार्वजनिक ठिकाणी धमकी दिली व अपमानजनक भाषेत शिवीगाळ केली.
फिर्यादी भोरडे यांनी याआधी देखील शिक्रापूर पोलीस ठाण्यात करपे यांच्याविरोधात धमकीबाबत तक्रार दाखल केली होती. तसेच, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पुरावा मोबाईलमध्ये असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, फिर्यादीने स्पष्टपणे सांगितले की, आपल्या जिवास व मालमत्तेस आरोपी व त्याच्या हस्तकांकडून धोका आहे.या प्रकारामुळे प्रशासनाच्या सुरक्षिततेबाबत आणि अपंग व्यक्तींच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कारंडे करीत आहेत.