शिरूर | ( साहेबराव लोखंडे )
फाकटे (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा गुणवत्ता व यशाची परंपरा कायम ठेवली असून, इयत्ता पाचवीतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ९ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले नावलौकिक सिद्ध केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण आहे.
या परीक्षेत रेणुका प्रवीण थोरात हिने सर्वाधिक २७४ गुण मिळवून यादीत आघाडी घेतली. तिच्यासह अभिजीत योगेश पिंगळे (२५८), पूजा सुरेश जोरी (२५२), आरोही सतीश कौठाळे (२५२), सिद्धी श्रीहरी निचित (२५२), पंकजा बाबुराव जोरी (२५०), प्रणव शहाजी निचित (२४८), हृदया दिपक येवले (२४६) आणि आदित्य अनिल गावडे (२४४) या विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी करत फाकटे शाळेचा झेंडा उंचावला.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक व जांबुत केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश काळे यांची साथ व वर्गशिक्षक हनुमंत वाळुंज यांचे परिश्रम आणि मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर , शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी विशेष अभिनंदन केले. गावचे सरपंच रेश्माताई पिंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ राळे, तसेच सर्व पालक व ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करत गौरव केला.
फाकटे शाळेच्या या यशामुळे गावाचे नाव पुन्हा एकदा उजळले असून, भविष्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.