विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांमधून सादर केल्या कलाकृती
पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे चित्र-हस्तकला प्रदर्शन उत्साहात
पारनेर|
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर विद्यालयात चित्र-हस्तकला प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम अण्णा खिलारी यांच्या हस्ते झाले . यावेळी प्राचार्य अर्जुन भुजबळ ,शिवाजी सावंत, मनीषा गाडगे, प्रा.अजित दिवटे, प्रा.सतीश फापाळे , क्रीडाशिक्षक बापूराव होळकर , एन.सी.सी प्रमुख मेजर संतोष पारधी , निलेश पाचारणे ,मनोहर रोकडे , श्रीकांत शिंदे सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी या प्रदर्शनाची संकल्पना -मांडणी विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी केली.
या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महा पुरुषांची रेखाटलेली चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. स्मरणचित्र, संकल्पचित्र , पेन्सिल रेखाटन,कोलाज चित्र , मुद्राचित्र या प्रकारातील चित्रांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
हस्तकला प्रदर्शनात पुठ्ठ्यापासून बनवलेली विविध घरे, इमारतीच्या प्रतिकृती , स्टोन पेंटिंग , कागदी फुले , पेन स्टॅन्ड, विविध प्रकारचे कागदी वॉल हँगिंग ,आईस्क्रीम स्टिक , काडेपेटी ,वर्तमानपत्र यापासून बनवलेल्या आकर्षक वस्तू ,कप मेकिंग ,वॉटर डेकोरेशन ,नारळ करवंटी पासून तयार केलेले घरे , बाहुल्या अशा आकर्षक वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या होत्या .हे प्रदर्शन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सादर करण्यात आले होते.
इयत्ता आठवीची वेदिका विश्वास हिने कागदी पुठ्ठ्यापासून बनवलेली कोल्हापुरी चप्पल व इयत्ता ८वी चा अविष्कार साठे याने चितारलेले निसर्गचित्र या प्रदर्शनाचे आकर्षण ठरले होते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये शिक्षकाने प्रोत्साहन व मार्गदर्शन करावे असे सांगत प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी यांनी प्रदर्शनाची पाहणी करून मार्गदर्शक शिक्षक – विद्यार्थी यांचे अभिनंदन व कौतुक केले . उत्कृष्ट चित्र हस्तकला विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विद्यालयातील दोन हजार विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला.