शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल
शिरूर |
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती १० हजार रुपये मागणार्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मुलाच्या विरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करु नये तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे याने तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या तक्रारीची ९ ऑक्टोबर रोजी टाकळी हाजी औट पोस्ट मध्ये पडताळणी करण्यात आली. माणिक मांडगे याने सुभाष मुंजाळ याच्याशी बोलण्यास सांगितले. खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ याने तक्रारदारांकडे साहेबांना देण्यासाठी म्हणून १० हजार रुपये लाच मागितली. त्याला माणिक मांडगे याने दुजोरा देऊन १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्ष सापळा कारवाई झाली नसली तरी लाचेची मागणी झाली असल्याने गुरुवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी दोघांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर हेअधिक तपास करीत आहेत.
शिरूर तालुक्यातील महसुल विभागातील काही तलाठी, मंडल आधिकारी, खरेदीखताच्या, वाटप पत्राच्या नोंदी पैश्याच्या हव्यासापोटी लवकर करत नाहीत. नागरीकांकडून ते नोंदी साठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असून ते आता लाचलुचपत विभागाच्या रडारवर असल्याची सुत्रांची माहीती आहे.