जांबुत येथे दहा एकर ऊस खाक..

विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट

0

जांबुत येथे दहा एकर ऊस खाक.. विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट

पिंपरखेड प्रतिनिधी – प्रफुल्ल बोंबे (दि. २६)

शिरूर तालुक्यातील जांबूत येथे सुमारे दहा एकर ऊसाच्या शेताला आग लागल्याने उसाचे पीक जळून खाक झाले,विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन हि आग लागल्याने आगीत भाऊसाहेब जोरी, बाबाजी जोरी, दत्तू जोरी,सुदाम जोरी, गोरख कदम या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे आग विझवणे शक्य झाले नाही. सदर घटनेची माहिती मिळताच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्या सूचनेवरून भीमाशंकर कारखान्याचे शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांचे सह भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी आणि पराग साखर कारखान्याचे कर्मचारी यांच्याकडून संबंधित जळीत उसाच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली असून लवकरच ऊसतोड करण्याबाबतच्या सूचना ॲड. प्रदीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत.

या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने सोयाबीन सह ऊस व इतर तरकारी पिकांचे मोठे नुकसान झालेले असून नवीन हंगामातील उसाच्या पिकाच्या भरोशावर इतर पिकांच्या अर्थिक भांडवलासाठी शेतकरी अवलंबून आहेत. मात्र अशा प्रकारची आपत्ती ओढवल्यास शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याची परिस्थिती निदर्शनास येत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस संपून आता हिवाळ्याची चाहूल लागलेली असताना पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी वाकलेले विजेचे खांब, विद्युत तारामध्ये पडलेले झोळ सुधारून घ्यावेत जेणेकरून पुढील अनर्थ टाळण्यास मदत होईल अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या जळीतामुळे बाधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.