साहेबराव लोखंडे
टाकळी हाजी | शिरूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात खरी लढत दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये होत आहे. विजयी उमेदवार कुणीही का असेना मात्र तो राष्ट्रवादीचाच असणार. यामुळे दोन्ही शिवसेना, भाजपा व इतर पक्षातील कार्यकर्ते (नेते वगळता) आणि त्या त्या पक्षाशी एकनिष्ठ असलेले सामान्य नागरिक की ज्यांनी आजवर राष्ट्रवादीचा रोष पत्करला आहे असे मतदार द्विधा मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील मागील काही महिन्यांतील राजकीय घडामोडीमुळे शिरूर तालुक्यात या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खुप काही राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादीचे दोन गटात विभाजन झाले, आणि काही भागातील भाजपा आणि शिवसेना नेते राष्ट्रवादी मध्ये सामील झाले. नेत्यांनी सोयीस्कर रित्या केलेला पक्ष बदल हा सर्वच कार्यकर्त्यांना रुचला असे अजिबात दिसत नाही. राष्ट्रवादी हा एकमेव राजकीय विरोधक समजणारे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजी आढळराव पाटील हाच पक्ष तर मोदींना साथ म्हणून राष्ट्रवादीचे आढळराव असे मानायला भाजपा चे कार्यकर्ते मनाची तयारी करत आहेत. वरवर जरी मानसिकता तयार करणे सुरू असेल तरी अनेकांची मने हे मानायला धजावत नाहीत अशी कुजबूज ऐकावयास मिळत आहे.
शरद पवार यांच्यावर नेहमीच शिरूरकरांची निष्ठा राहिलेली आहे. यामुळे एकीकडे अमोल कोल्हे यांच्यामुळे नाही तर शरद पवार यांच्यामुळे त्यांच्या विचारसरणीच्या व्यक्तीला मत द्या तर दुसरीकडे अजित दादांना पाठबळ देण्यासाठी आढळराव पाटील हे स्वगृही परत आलेत, यामुळे त्यांना मतदान करा असे नेते मंडळी सांगत आहेत.
शिरूर तालुका हा दोन विधानसभा मतदार संघात विभागाला गेल्याने शिरूर आंबेगावचे लोकप्रतिनिधी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूर हवेलीचे लोकप्रतिनिधी अशोकबापू पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे यांच्या ठोस भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या लोकप्रतिनिधींना मानणारा वर्ग मोठा असल्याने त्यांच्या भोवती तालुक्याचे राजकारण फिरत आहे. परंतू त्यांनी घेतलेली भूमिका सर्वच कार्यकर्त्यांना मान्य होतेय असेही चित्र नाही. हे गुंतागुंतीचे समीकरण सोडविताना या नेत्यांनाच विठ्ठल मानणारे सामान्य नागरिक मात्र… विठ्ठला कोणता हा झेंडा घेवू हाती…असा प्रश्न उपस्थित करत आहे.