प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड ( दि. २२)
शिरूर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे चार जणांचा बळी गेला आहे. नागरिकांवर झालेले हल्ले आणि धोक्यात आलेले पशुधन यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झालेली दिसून येत आहे.
शुक्रवार (दि.२२) रोजी अशाच प्रकारे पिंपरखेड- जांबूत रस्त्यावर दोन बिबट्यांचा मुक्तसंचार अनेकांच्या निदर्शनास आल्याने महिलासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरखेड (ता.शिरूर) येथे सकाळच्या वेळी होणार असलेल्या एका दशक्रियेच्या विधीसाठी जाताना आणि विधी आटोपून परतताना रंगनाथस्वामी मंदिराजवळ असलेल्या उसाच्या शेताच्या कडेला अनेक महिलांसह ग्रामस्थांनी रस्त्यावर मुक्तपणे संचार करणारा बिबट्याचा थरार अनुभवल्याने एकच तारांबळ उडाली. तर या रस्त्याने अनेक दुग्ध व्यावसायिक आणि शालेय विद्यार्थी सकाळच्या प्रहरी ये-जा करत असतात. मात्र बिबट्यांच्या या संचारामुळे नागरिकासह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आपल्या पाल्यांची खबरदारी घेत पालकांनी त्यांना शाळेत पोहचविणे गरजेचे असून अशा प्रसंगी बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या जीवघेण्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरे लावावेत. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.