टाकळी हाजीतील महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून खातेदारांची पिळवणूक
ग्रामपंचायत सह संघटनांकडूनही क्षेत्रीय कार्यालयास निवेदन
टाकळी हाजी : वृत्तसेवा
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे अर्धा डझन तक्रारी वरिष्ठांकडे देण्यात आल्या असून त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
टाकळी हाजी सह १४ गावांसाठी ही बँक एक महत्वाचा घटक आहे. विशेष करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो , तसेच शेतकी अधिकारी नसल्याचे कारण दिले जाते, अशाप्रकारे ग्रामपंचायत टाकळी हाजी , ग्रामपंचायत माळवाडी , ग्रामपंचायत वडनेर खुर्द, शेतकरी संघटना, बळीराजा संघटना आणि शिवबा संघटने कडून बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
टाकळी हाजी तील शाखेमध्ये परिसरातील मोठ्या प्रमाणात खातेदार असून शाखाधिकारी हे सहकार्य करणे तर सोडाच परंतु खातेदारांची पिळवणूक करत असून त्यामुळे खातेदारांना , नागरिकांना मनस्ताप होत आहे . या शाखाधिकार्याची त्वरित बदली व्हावी अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे टाकळी हाजी चे सरपंच अरुणा घोडे,माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, वडनेर चे सरपंच शिल्पा निचित, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, बळीराजा संघटनेचे तालुका अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे यांनी सांगितले.