डाळींब शेतकऱ्यांसाठी हंगामाचा शेवटही होतोय गोड
डाळींब शेतकरी जोमात : व्यापाऱ्यांची खरेदीसाठी लगबग
टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात डाळींब शेती मोठ्या प्रमाणात असून परिसरातील बागांची फळ तोडणी सुरू आहे. टाकळी हाजी, माळवाडी या गावांमध्ये जागेवर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची रेलचेल वाढली आहे. बाजारभावात वाढ होत असल्याने व्यापारी दररोज चढ्या दराने खरेदी करत आहेत.
महिनाभरापासून बागांची फळ तोडणी सुरू असल्यामुळे थोड्या प्रमाणात बागा शिल्लक राहिलेल्या आहेत.त्यामुळे त्या बागांचे व्यवहार करण्यासाठी व्यापारी स्पर्धा करत आहेत. बांगलादेश, हैद्राबाद, चेन्नई, केरळ,संगमनेर,सांगोला या भागातील अनेक व्यापाऱ्यांनी टाकळी हाजी,निघोज या ठिकाणी ठाण मांडले असून शिल्लक बागांच्या व्यवहारासाठी कसरत करत आहेत.
समाधानकारक बाजारभाव मिळाल्यामुळे टाकळी हाजी परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चैतन्य फुलले आहे. डाळींब तोडणी केल्यानंतर लगेच ऑनलाईन पेमेंट केले जात असल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल दररोज होत आहे.
थोड्याफार बागा शिल्लक असताना बाजारभाव तेजीत असल्याने डाळींब शेतकऱ्यांसाठी या हंगामाचा शेवट ही गोड होणार आहे.
नारायण कांदळकर डाळींब उत्पादक. टाकळी हाजी
शेतमालाचे भाव पडल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना डाळींब शेतीने मोठा आधार दिला असून भविष्यात तरुण वर्गाने पाणी मुबलक असताना पारंपरिक पिके घेण्यापेक्षा हमखास उत्पादन देणाऱ्या फळबागांची लागवड करावी.
कैलास गावडे कृषी मार्गदर्शक, टाकळी हाजी