पिंपरखेड येथे जबरी चोरी… शिरूर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
प्रफुल बोंबे
पिंपरखेड : प्रतिनिधी
शिरूरच्या बेट भागात गेली अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र वाढलेले आहे. मात्र या चोरीच्या घटनांमधील चोरट्यांना जेरबंद करण्यात अद्यापही शिरूर पोलिसांना अपयश आलेले दिसत आहे. आधीच्या चोऱ्यांचा तपास लागण्याआधीच गुरुवार (दि.१८) रोजी पहाटे एकच्या सुमारास पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील दाभाडेमळा परिसरात चोरट्यांनी जबरी चोरी करून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेत पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस कर्मचारी विशाल पालवे, पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास दाभाडेमळा येथील बाळू नावजी दाभाडे हे आपल्या कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. जवळ बाळगलेल्या कोयता, गलूर आणि दांडक्याच्या धाकाने घरातील महिलांच्या अंगावरील सुमारे नऊ ते दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. तसेच घरातील कपाटे उचकून वापरतील कपडे बाहेर अस्ताव्यस्त फेकून दिली. यावेळी प्रत्यक्षदर्शी सात ते आठ जण या टोळीत असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. तद्नंतर आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावून जवळच असणाऱ्या अंजनाबाई धोंडिभाऊ दाभाडे यांच्या घरावर चोरांनी मोर्चा वळवून वृद्ध महिलेच्या कानातील सोने वेल दागिना व पाच हजार रोख रक्कम असा ऐवज चोरून नेत पलायन केले.
या चोरीच्या घटनेत अंदाजे रोख रकमेसह अंदाजे सुमारे पाच लाखांहून अधिक रकमेच्या मुद्देमाल चोरीला गेला असून घटनास्थळी सापडलेल्या वस्तूवर चोरट्यांच्या बोटांचे ठसे (फिंगर) तपासणी पथक व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.
चार महिन्यांपूर्वी पंचतळे परिसरात जाधव कुटुंबियांची झालेली जबरी चोरी, पंचतळे, जांबूत, पिंपरखेड भागातील फोडलेली दुकाने, मेडिकल, तर टाकळी हाजी, माळवाडी, पिंपरखेड या भागातील शेतकऱ्यांचे कृषिपंप, केबलचोरी, तसेच कृषीयंत्र चोरी, याबरोबरच दुचाकी चोऱ्या तसेच टाकळी हाजी, माळवाडी परिसरातील डाळिंब चोरी, कवठे येमाई येथील व जांबूत येथील कळमजाई मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी अशा अनेक घटनांचा तपास अद्यापही लागलेला नाही. यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चोरीच्या घटनेतील आरोपींवर बेधडकपणे होत नसलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून पिंपरखेड येथील दोनही जबरी चोरीच्या घटनेतील चोरट्यांना जेरबंद करण्याचे आवाहन शिरूर पोलिसांसमोर उभे ठाकले असल्याने तपासाला गती देत आरोपींना तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.