निवृत्त कलाशिक्षक रामदास कवडे सर वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित
पारनेर : वृत्तसेवा
पुणे जिल्हा ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका आयोजित सेवाभावी संस्था व व्यक्तींचा कार्य गौरव सोहळा भारत भवन आळेफाटा येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, वृक्षमित्र तथा माजी कलाध्यापक रामदास गणपत कवडे ( सर) यांना वृक्षमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी आदरणीय ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी यांच्या पुण्यस्मरणार्थ सामाजिक उपक्रमशील दिन साजरा होत असतो. यानिमित्त सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या सेवाभावी संस्था व कार्यकर्त्यांचा कार्य गौरव करण्यात येतो .
सामाजिक कार्यकर्ते, वृक्षमित्र तथा माजी कलाध्यापक रामदास गणपत कवडे ( सर) यांना त्यांच्या वृक्ष लावा – वृक्ष वाढवा या उपक्रमांतर्गत लग्न ,वाढदिवस, दशक्रिया विधी या कर्यक्रमावेळी पारनेर व जुन्नर तालुक्यासह आतापर्यंत हजारो वृक्ष लागवड करून संगोपन केले. तसेच देवाची आळंदी येथील स्वर्ण पिंपळाच्या बिया आणून त्यापासून अनेक पिंपळाची रोपे तयार केली व त्याचे वितरण केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘वृक्षमित्र’ म्हणून जुन्नर चे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, ह.भ.प. बळवंत महाराज आवटे, ज्ञानेश्वर ग्रामोणत्ती मंडळाचे अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब आवटे व मान्यवर उपस्थित होते. या गौरवानिमित्त कवडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.