पिंपरखेड येथे लोकवर्गणीतून साकारणार भव्य सुसज्ज बैलगाडा शर्यत घाट
पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचा वारसा आणि छंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यत घाट उभारण्याचा चंग बांधत ग्रामस्थांनी एकजुटीने २० ते २२ लक्ष रूपये लोकवर्गणीच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीसाठी नवीन घाट उभारणीचे काम हाती घेतले आहे.जिल्ह्यातील नामांकित भव्य,सुसज्ज धावपट्टी अशी घाटाची ओळख निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी एकीचे बळ दाखवत लाखो रूपये लोकवर्गणी उभी केली आहे.
पिंपरखेड गावात दरवर्षी ग्रामदैवत तुकाईदेवी यात्रा महोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. या निमित्ताने बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे. बैलगाडा शर्यत बंदीच्या कालावधीत बैलगाडा शर्यतीसाठी असलेल्या बैलगाडा घाटाच्या जागेवर महावितरण कंपनीचे वीज उपकेंद्र उभारण्यात आले.त्यामुळे बैलगाडा घाट नामशेष झाला होता.
मागील वर्षी बैलगाडा शर्यत बंदी उठल्याने गावच्या यात्रा उत्सवाचे आकर्षण असलेल्या पारंपरिक बैलगाडा शर्यतीची ही परंपरा सुरु रहाण्यासाठी पिंपरखेड ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेऊन लोकवर्गणीतून नवीन बैलगाडा शर्यत घाट बांधण्याचे कार्य प्रगतीपथावर सुरू केले.ग्रामदैवत तुकाईदेवी यात्रा उत्सवानिमित्त या नवीन घाटावर ४ व ५ एप्रिल रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या शर्यत घाट व व्यासपीठ साठी २० ते २२ लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे.बैलगाडा घाटाच्या स्वागत कक्षासाठी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी स्व.जी.पी.दाभाडे यांच्या स्मरणार्थ विकास दाभाडे यांनी तब्बल साडे सात लक्ष रूपये देणगी दिली आहे. तसेच गावातील ग्रामस्थांनी देणगी व माणसी लोकवर्गणीतून हातभार लावत लाखो रूपयांचा हा निधी उभारून भव्य सुसज्ज घाट बनवण्याचा चंग बांधला आहे.नवीन बांधकाम सुरु असलेल्या बैलगाडा शर्यत घाटाची पहाणी भिमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील,राजेंद्र गावडे यांनी केली.लोकवर्गणीतून सुरु असलेल्या या कामाबाबत त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.
भिमाशंकर साखर कारखान्याने हा घाट उभारण्यासाठी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल प्रदीप वळसे पाटील व राजेंद्र गावडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच राजेंद्र दाभाडे,भिमाशंकर पतसंस्थेचे अध्यक्ष गोपाळ दाभाडे, माजी उपसभापती बाळशिराम ढोमे माजी उपसरपंच दामोदर दाभाडे,माजी उपसरपंच रामदास ढोमे,यात्रा कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती बोंबे,खजिनदार बन्शी पोखरकर,तंटामुक्ती अध्यक्ष दिलिप बोंबे,शरद बोंबे, शिवाजी बोंबे व ग्रामस्थ उपस्थित होते.