म्हसे बु. येथे उसाच्या शेतात आढळला मृत बिबट्या
टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा
म्हसे बु.( ता.शिरूर) येथील गणेश वायसे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी ( दि.२) मृत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे साम्राज्य पसरले आहे .गणेश यांचा मुलगा सोमेश्वर हा ऊसात तणनाशक फवारणी करत असताना त्यास उग्र वास आला व समोर मृत बिबट्या दिसून आला. त्या वासावरून बिबट्याचा मृत्यू तीन चार दिवसांपूर्वीच झाला असावा असा अंदाज स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी वर्तविला आहे. सदर घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते काळुराम पवार यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती कळविली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली असून या भागतील प्राण्यांवर झालेल्या हल्ल्यांत बहुतांशी कोंबड्या, कुत्रे, रानडुक्कर यांची शिकार केल्यानंतर बिबट्यांचा मोर्चा पाळीव पशुधनावर वळला असून गायी,वासरे, शेळ्या,मेंढ्या यांच्यावर अनेक हल्ले झालेले आहेत.
पिंपरखेड, जांबुत,वडनेर, फाकटे या भागात मनुष्यावर हल्ले झाले असून या भागातील चार लोकांना नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. टाकळी हाजी, कवठे येमाई, मलठण, आमदाबाद , माळवाडी, म्हसे, रावडेवाडी, निमगाव दुडे, शरदवाडी, सविंदणे या भागातील शेतकऱ्यांसाठी बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. बिबट्यांनी मनुष्यवस्ती जवळ येऊन हल्ले सुरू झाल्याने या भागातील शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. शेतात गेल्यानंतर परत घरी परतू याची खात्री शेतकऱ्यांना राहिली नाही.जीव मुठीत धरून शेतात काम करावे लागत आहे.
या भागातील बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे,तसेच शेतीसाठी दिवसा वीज द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.