जांबुत येथे हळदी कुंकू समारंभ…
पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा
सण, उत्सव,धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना नेहमीच डावलले जाते, या पारंपरिक प्रथा मोडीत काढत जांबूत ( ता.शिरूर ) येथे अस्मिता महिला ग्रामसंघ व बचत गटातील महिलांंनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात गावातील विधवा महिलांची खणा नारळाने ओटी भरून त्यांना हळदीकुंकू व संक्रांतीचे वाण देऊन सन्मानित करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांसद आदर्श ग्राम जांबूत येथे हळदीकुंकू समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या हळदीकुंकू कार्यक्रमात गावातील विधवा महिलांना विशेष निमंत्रित करून बचत गटातील महिलांनी या सर्व विधवा महिलांचे हळदीकुंकू, खणानारळाने ओटी भरून संक्रांतीचे वाण देऊन सन्मानित करण्यात आले. विधवा महिलांवर येणारी बंधने झुगारून समाजाने त्यांना मानाचे स्थान दिले पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे असे वक्तव्य शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे यांनी केले. यावेळी जांबूत च्या माजी सरपंच डॉ.जयश्री जगताप,काठापुरच्या सरपंच सिमा थिटे,फाकटे सरपंच रेखा दरेकर,जांबूत उपसरपंच राणी बोऱ्हाडे,ग्रामसंघाच्या अध्यक्षा सुनिता जोरी,लिपिका शुभांगी जोरी,प्रगती जोरी,श्वेता जोरी,कुंदा थोरात,तसेच जांबूत गावातील सर्व बचत गटाचे प्रतिनिधी, पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी सोनवणे यांनी केले. सुत्रसंचालन शुभांगी अर्जुन यांनी ,आभार ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया जगताप यांनी केले.