चुकीच्या विजबिलांमुळे ग्राहक त्रस्त..

नियमितपणे रीडिंग आकारणी करण्याची मागणी

0

पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१४)

 

राज्यात विजेच्या प्रश्नासंदर्भात अनेक घडामोडी घडत असताना ग्राहकांचे चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेत अथवा अंदाजे केली जाणारी रिडिंग व अवाजवी बिलांची आकारणी महावितरणकडून होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटी पद्धतीने विजेच्या मीटरचे रिडिंग आकारणी करण्यासाठी अनेक कर्मचारी नियुक्त केलेले आहेत, मात्र प्रत्यक्षदर्शी जाऊन रिडिंग न घेता आणि विजेचा वापर न करता देखील अनेक शेतकऱ्यांना महावितरणकडून अवाजवी बिले आकारली जात आहे.

अशा प्रकारे वारंवार महावितरण विभागाकडून झालेल्या चूक दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून, जर रिडिंग न घेता शेतकऱ्यांना वीज आकारणी केली जात असेल आणि बिलांचे दुरुस्तीसाठी हेलपाटे मारावे लागत असतील तर एकही ग्राहक वीजबिल भरणार नसून महावितरण विभागाने यापुढील काळात योग्य सूचनांची अंमलबजावणी करत प्रत्यक्षदर्शी थेट ग्राहकांचे मीटरपर्यंत पोहचून वीजबिल आकारणी करावी, तसेच चुकीच्या व थकीत वीजबिलासंदर्भातील प्रश्न तातडीने सुटले नाही, तर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा पिंपरखेड भाजपचे अध्यक्ष रवींद्र बोंबे यांनी दिला आहे.

अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नाही. अशातच बळीराजा मेटाकुटीला आला असताना चुकीच्या पद्धतीने येणारी भरमसाठ बिले कुठून भरायची ? असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेसमोर असल्याचे दिसून येत आहे. चुकीच्या पद्धतीने विजेचा वापर करणाऱ्या उद्योग व्यवसायांना महावितरण पाठीशी घालते, मात्र प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना आलेल्या अवाजवी बिलांमुळे शासनदरबारी हेलपाटे मारावे लागत असून संबंधित वीजबिले कमी करण्यासाठी अन्यथा विद्युत रोहीत्रांचे इतर कामासाठी वरिष्ठ अधिकारी यांचेकडे गेल्यानंतर सर्वसामान्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसून तुच्छतेची वागणूक दिली जात आहे. अशातच आपल्या कार्यक्षेत्रात काम करणारे लाईनमन व स्थानिक कर्मचारी हे आपापली महत्वाची कामे बाजूला ठेऊन अनकेदा रिडींग आकारणी करत असल्याचे निदर्शनास येत आहे, मग नियुक्त केलेले कर्मचारी वेळेवर आकारणी का करत नाहीत ? असा प्रश्न वाढीव वीजबिल आकारणीला कारणीभूत ठरत असून अनेक ठिकाणी विजेच्या तारांमध्ये पडलेला झोळ, वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत वाहिनी, नादुरुस्त आणि उघड्या स्वरूपातील फ्युज पेट्या याची दुरुस्ती होणे गरजेचे असून एखादी अनावधानिक घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असे अनेक भयंकर प्रश्न प्रलंबित असून महावितरण मात्र झोपेचे सोंग घेते कि काय ? अशा प्रश्नांवर मात्र नागरिकांमधून तीव्र भावना उमटत आहेत.

अनेक ग्राहकांना महावितरण विभागाचे नियमावलीची माहिती नसल्याने आलेल्या थकीत बिलांचा आर्थिक भार सोसावा लागत असून वेळेवर रीडिंग आकारणी न झाल्यास संबंधित मर्यादेच्या बाहेर रीडिंग गेल्यास ठरवून दिलेल्या वेगळ्या रकमेची युनिट आकारणी होत आहे. महावितरणच्या या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक ग्राहक यामध्ये भरडले जात असून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी गावागावत या नियमावलीच्या बाबतीत जनजागृती करून शेतकरी व ग्राहकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.