पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१२)
बेल्हे –जेजुरी राज्यमार्गावर पिंपरखेड (ता.शिरूर) गावचे हद्दीत बोऱ्हाडेवस्ती नजीक बुधवार (दि.११ ) रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक देऊन घडलेल्या भीषण अपघातात अविनाश नवनाथ गावशेते हा २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. याबाबत अशोक दिनकर गावशेते यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अविनाश हा लाखणगाव (ता.आंबेगाव) येथे मोटार रिवायडिंगचे काम शिकत होता. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून पिंपरखेडकडे परतत असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली व वाहनचालक आपल्या वाहनासह फरार झाला . या अपघातात अविनाश याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अविनाश याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. यावेळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून अविनाश याच्यावर पिंपरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अविनाश कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या पाश्चात आई, वडील. आजी, आजोबा, चुलते व बहिण असा परिवार आहे.
ऐन तारुण्यात आलेल्या अविनाशच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी एक दिवसाचा दुखवटा पाळत गाव बंद ठेवले असून धडक दिलेल्या वाहनाचा तातडीने तपास करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.