राज्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा २७ एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा
शेतकऱ्यांवर संकट येण्याची येण्याची शक्यता
शिरूर | (साहेबराव लोखंडे)
राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित अडचणींवर शासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् अॅण्ड सीडस् डिलर्स असोसिएशन (माफदा) यांनी २७ एप्रिल २०२६ पासून राज्यभर बेमुदत विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात कृषी आयुक्तालय, पुणे येथील कृषी संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व महासचिव विपीन कासलीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बियाणे, खते व किटकनाशक विक्री व्यवसायातील अनेक अडचणींबाबत गेल्या चार-पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
विक्रेत्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये खत पुरवठ्यातील ‘लिंकींग’ पद्धत बंद करणे, शेजारील राज्यातून येणाऱ्या अवैध HTBT कपाशी बियाण्यांवर बंदी घालणे, ‘साथी’ पोर्टलचा वापर उत्पादक कंपन्यांपर्यंत मर्यादित ठेवणे, खते पुरवठा ‘FOR’ पद्धतीने करणे, तसेच खतांच्या विक्री मार्जिनमध्ये वाढ करणे यांचा समावेश आहे.
याशिवाय, सीलबंद पॅकिंगमधील बियाण्यांचे नमुने फेल गेल्यास विक्रेत्यांना आरोपी न ठरवता साक्षीदार मानावे, गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांच्या प्रलंबित रकमा तातडीने द्याव्यात, तपासणी अधिकाऱ्यांची वाढवलेली संख्या कमी करावी, तसेच अवैध किटकनाशके व बियाण्यांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, या सर्व मागण्यांबाबत पुढील आठ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे २७ एप्रिलपासून बेमुदत बंद ठेवण्यात येतील. या निर्णयामुळे शेती हंगामाच्या तोंडावर खत, बियाणे व किटकनाशकांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा शेतकरी व विक्रेते दोघांनाही मोठा फटका बसू शकतो, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या वतीने नाना फुलसुंदर यांनी व्यक्त केली आहे.