कळवंतवाडीची समृद्धी चव्हाण सुवर्णपदक विजेती

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

0

शिरूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी येथील कु. समृद्धी अजय चव्हाण हिने चमकदार कामगिरी करत १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३९८ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे समृद्धीची राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली असून ही स्पर्धा येत्या २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान नागपूर येथे पार पडणार आहे.
मागील वर्षभरात समृद्धीने उत्तराखंड, भोपाळ, दिल्ली, केरळ आणि पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चाचणी, राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

अल्पावधीत म्हणजेच दीड वर्षांच्या कालावधीत सतत परिश्रम घेत तिने भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे, असे तिचे प्रशिक्षक शरद तरटे (युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब, शिरूर) यांनी सांगितले.


समृद्धीच्या यशामागे तिच्या आई-वडिलांचा प्रोत्साहनपर आधार, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांसह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, स्थानिक स्तरावर तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.