टाकळी हाजीतील सख्या बहिणींचा राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत प्रवेश
मिजबा व तनिशा मुजावर सुवर्णविजेता, हिमाचलमध्ये करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
टाकळी हाजी : ( साहेबराव लोखंडे )
पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील दोन सख्या बहिणींनी अस्मिता खेलो इंडिया किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णयश संपादन करत राज्यभरात गावाचे नाव उंचावले आहे. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स ॲण्ड स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तसेच वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच सातारा येथे ही स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत बापूसाहेब गावडे विद्यालयाच्या मिजबा मुजावर आणि तिची बहीण तनिशा मुजावर यांनी सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या मांडवओव्हळ शाळेतील माहिन मुजावर हिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. या विजेत्या खेळाडूंना इंडिया ततामी चेअरमन व पुणे ग्रामीण किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा खेलरत्न पुरस्कारप्राप्त सतिश राजहंस यांचे मार्गदर्शन लाभले.
दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी या टाकळी हाजीतील सख्या बहिणींची निवड झाली असून त्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.अशी माहिती मुलींचे पालक शेख शौकत मुजावर यांनी दिली.
या यशस्वी कामगिरीबद्दल ग्रामस्थ, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.