कांदा प्रश्न पेटला..निघोजमध्ये आमरण उपोषणाचा बिगुल

शेतकरी कर्जमाफी व कांदा दरवाढीसाठी रूपेश ढवण यांचे २० ऑगस्ट पासून आमरण उपोषण

0

निघोज | प्रतिनिधी (दिनांक १९ ऑगस्ट २०२५)

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व कांदा उत्पादकांना हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रूपेश ढवण यांनी राज्यव्यापी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन बुधवार, दि. २० ऑगस्टपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील वात्सल्य हॉस्पिटलसमोरील मैदानावर सुरू होणार आहे.

या उपोषणात राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून महेंद्र पांढरकर, देवराम लामखडे, पोपट तनपुरे, कचरू वरखडे, बाबाजी पठारे, दादा पाटील वराळ, संतोष लामखडे, संजय तनपुरे, अशोक शेटे, राजेंद्र वाळुंज, मंदाबाई वरखडे, बबिता काळे, शोभा ढवळे, सोनीताई पवार, हिराबाई वराळ, साखराबाई वरखडे आदींसह शेतकरी बांधव साखळी उपोषण करणार आहेत.

पाच हजार लोकांची बसण्याची व्यवस्था मैदानात करण्यात आली असून, शेतकरी संघटना, व्यापारी, पत्रकार संघटनांसह स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे. पत्रकार संघटनाही एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

याआधी जुलै महिन्याच्या अखेरीस रूपेश ढवण यांनी निघोज एसटी बसस्थानकासमोर पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार काशिनाथ दाते, दादाभाऊ कळमकर, दिपक आण्णा लंके, विश्वनाथ कोरडे यांनी आश्वासन दिले होते. मात्र ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा अल्टिमेटम दिला होता.

रुपेश ढवण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकऱ्यांना कर्जमाफी व कांद्याला किमान ३५ ते ४० रुपये किलो दर मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर माझा बळी जरी गेला तरी शेतकऱ्यांचे भले व्हावे हीच इच्छा आहे.”

श्रावण महिन्यात सुरू होणाऱ्या या उपोषणाला अध्यात्माची जोड देण्यात आली असून २० ते २९ ऑगस्ट या कालावधीत दररोज सायंकाळी प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अशोक महाराज कानडे, तुषार महाराज गुंड, धनंजय महाराज गोरडे, बाळासाहेब महाराज पठारे, सर्जेराव महाराज मस्कर, बबन महाराज थोरात, बाबा महाराज खामकर, श्रीराम महाराज घुले, पोपट महाराज तनपुरे व श्रीहरी महाराज पवार यांचे प्रवचन होणार आहेत.

दररोज संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली असून विवेक खंडू इधाटे, गौतम तनपुरे, राजू ढवळे, संपत जानकू वाढवणे, मयुर गुगळे, अरुण कान्हू लंके, दौलत पांढरकर, सुभाष साठे व प्रवीण साठे, राजेंद्र भास्कर लामखडे, विलास गंगाराम कवाद, संजय काळे, आण्णा वाघ, प्रकाश वाघ, संदिप थोरात व संतोष थोरात आदींच्या वतीने प्रसादसेवा दिली जाणार आहे.

शेतकरी प्रश्नांसाठी सुरू होणाऱ्या या राज्यव्यापी आमरण उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.