शिरूर | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. याला आळा घालत शिरूर पोलिसांनी अंतरराज्यीय सराईत टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान या टोळीवर ९ गुन्हे उघड झाले असून पोलिसांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल यामध्ये ९ गुन्हयांमधील चोरी केलेल्या एकुण ३१५ किलो वजनाच्या अडीच लाख रूपये किंमतीच्या ताब्यांच्या कॉईल व तीन लाख रूपये किंमतीचे गुन्हयामधील वापरलेले वाहन ( एम एच ०१ ए एच ३९१२) जप्त करण्यात आले आहे.
दिनांक ४ जुलै रोजी आंबळे (ता. शिरूर) येथील १००/२२ के.व्ही. क्षमतेच्या रोहित्रातून ५० किलो तांब्याच्या कॉईलची चोरी झाली होती. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकारांमुळे परिसरातील विजपुरवठा खंडित होऊन ग्रामस्थ व उद्योजकांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी चिखली (पुणे) येथे येणार आहेत. त्यानुसार सापळा रचत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. लवकुश कुमार उर्फ लवकुश राम प्रसाद गौतम (वय २२, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), मोहम्मद फरान खान उर्फ साहील (वय २१, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), मुजाहिर सौकत अली खान (वय २२, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) या आरोपींनी त्यांच्या दोन साथीदारांसह (राहुल गुप्ता व लवकुश मिश्रा ) शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ९ ठिकाणी डी.पी. चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अरुण उबाळे, शरद वारे, विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांच्या पथकाने केली.
शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.