टाकळी हाजी | मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे रविवारी (दि.२८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती सुरू असताना बैलगाडा घाटातच शिंदे वाडीतील स्थानिक नागरिकांमध्ये अचानक वादावादी झाल्याने शर्यती बंद करण्यात आल्या. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले.
शिंदेवाडी येथील स्थानिक दोन कुटुंबात ही वादावादी झाली असून भांडणाचे कारण उशीरापर्यंत समजू शकले नाही. संजय रखमा शिंदे (वय अंदाजे ३५ वर्षे) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या गावोगावी यात्रा सुरू असून बैलगाडा शर्यत हे यात्रेचे मुख्य आकर्षण बनले आहे. शर्यती सुरू झाल्यापासून बैलगाडा प्रेमी प्रत्येक यात्रेतील शर्यतीत सहभाग नोंदवत आहेत. मात्र अशा प्रकारे तंटे झाल्यास यात्रा बंद होवू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. संवेदनशील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल तरच शर्यती व्यवस्थित पार पडतील अशी अपेक्षा बैलगाडा मालकांकडून व्यक्त होत आहे.