थेट शाळेच्या क्रीडांगणावरच बिबट्याची एन्ट्री, विद्यार्थ्यांची सुरक्षा “रामभरोसे”

0

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड 

l पिंपरखेड (ता.शिरूर) येथे गेली तीन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपासून या भागात समाधानकारक पाऊस पडला असल्याने उसाचे शेतातील बिबट्यांनी आपला मुक्त संचार वाढवला असून शनिवार (दि.२३ ) रोजी सकाळीच दिवसाढवळ्या थेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावरच बिबट्याचे दर्शन झाल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये मात्र मोठी खळबळ उडाली. बिबट्याच्या भीतीने विद्यार्थी मात्र धास्तावले असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आल्याने वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी भितीने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केली आहे. जर शाळेच्या सभोवतालीच बिबट्या ठाण मांडून असेल तर आम्ही विद्यार्थी शाळेत कसे पाठवायचे? असा संतप्त सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला. वनविभागाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या भागात आपली फोर्स पाठवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण ढोमे व सोसायटीचे संचालक नरेंद्र बोंबे यांनी केली आहे.

 

पिंपरखेड परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याचे कळताच माजी सभापती देवदत्त निकम यांनी याबाबत माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या आहेत.मागील वर्षात याच परिसरात चार जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली असताना देखील वनविभागाकडून मात्र ठोस अशा उपाययोजना का करण्यात येत नाही याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी कृषीपंप चालू करण्यासाठी जात असलेल्या उज्वला गुंजाळ यांच्यासमोर झाडावरून दोन बिबट्यांनी उडी मारून त्यांच्या दिशेने येण्याचा प्रयत्न केला .यावेळी आरडाओरडा करून त्यांनी तेथून पळ काढला असल्याचे सांगितले. तसेच गावातील एका दशक्रियेसाठी जात असलेल्या काही नागरिकांना यावेळी भररस्त्यातच बिबट्याचे दर्शन झाले तर शेतकरी महेंद्र ढोमे यांचे ओट्यावर समूहाने बिबट्याने आपला मोर्चा वळवला होता. पशुसेवक डॉ. चंद्रकांत वरे यांचे घराचे छपरावर रात्रभर आसरा घेत बिबट्याने ठाण मांडून कालवडीवर हल्ला केला असल्याचे वरे यांनी सांगितले .अशा प्रकारे मागील आठवड्यात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली असल्याचे दिसून येते. यासाठी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचेशी संपर्क साधला असता सदरच्या भागामध्ये तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांचेशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, सदरच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य मोठे असून दोन दिवसांपासून काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. ज्या ज्या भागात बिबट्याची दहशत वाढलेली आहे त्या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. संबंधित ठिकाणी वनकर्मचारी यांची संख्या वाढवून परिसरात पाहणी करून तातडीने पिंजरे लावण्यात येणार आहेत.तरी नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

वाडी, वस्ती बरोबरच बिबट्याने आपला मोर्चा आता थेट शाळेकडे वळवला असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येऊ लागली असून यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. परंतु या शाळेच्या संरक्षक भिंतीचे तातडीने काम होणे गरजेचे आहे. शाळेच्या बाजूला ओढा असल्याने मोठी लपण निर्माण झाली असून बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वारंवार मागणी केलेल्या संरक्षण भिंतीचे कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा.

किरण ढोमे ,अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती

Leave A Reply

Your email address will not be published.