प्रफुल्ल बोंबे (पिंपरखेड प्रतिनिधी)
पिंपरखेड (ता.शिरूर) येथील शेतकरी संतोष दादाभाऊ पोखरकर यांची हिरो होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच १२ आर जे २३९८ (दि.०३ रोजी) पिंपरखेड ग्रामपंचायतीचे कोपऱ्यावर लावली असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत पोखरकर यांनी इतरत्र दुचाकीचा शोध घेतला असता कुठेही आढळून न आल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीमुळे पोखरकर यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
नियमितप्रमाणे गावात आल्यानंतर पोखरकर हे आपले काम आटोपून दुचाकी लावलेल्या ठिकाणी आले असता सदर ठिकाणी त्यांना आपली दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. दुचाकी चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली. मात्र सदर दुचाकी कोठेही आढळून न आल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
शिरूरच्या बेट भागात अशा प्रकारे चोऱ्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकऱ्यांशी निगडीत कृषिपंप, केबलचोरी, दुचाकीचोरी, कृषीयंत्र चोरी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने पोलीस प्रशासनाने या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करणे गरजेचे आहे.
जानेवारी आणि मे महिन्यात पिंपरखेड (ता.शिरूर) येथे जबरी चोरी आणि दरोड्याची घटना घडली आहे. मात्र सदर गुन्ह्यांची उकल करून शोध घेण्यास मात्र शिरूर पोलिसांना अपयश आले असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे होणाऱ्या गुन्ह्यांचा उलगडा न झाल्यास व चोरट्यांचा शोध न लागल्यास आपण आंदोलन करणार असल्याचा इशाराही शेतकरी संघटनानी दिला असून संबंधित अन्यायग्रस्त कुटुंबाना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने या गुन्ह्यांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.