प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड
मागील एक महिन्यापूर्वी बेल्हे-जेजुरी राज्यमार्गावर पिंपरखेड (ता.शिरूर) गावच्या हद्दीत पंचतळे परीसरालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच महिनाभरातच सोमवार (दि.१०) रोजी मागील घटनास्थळावरच सात वर्षे वयोमान पूर्ण असलेला नर संवर्गातील बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक लहू केसकर, वनसेवक महेंद्र दाते यांचेसह आंबेगाव रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून वनविभागाचे शासकीय वाहनातून मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी शिरूर येथे नेण्यात आले.
गेली दीड वर्षांपासून या भागात बिबट्यांची संख्या वाढली असून दिवसाढवळ्या समूहाने बिबट्याचा मुक्त संचार या भागात वाढला आहे. मागील वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात जांबूत, पिंपरखेड परिसरात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांवर हल्ले झाले आहेत तर पशुधनही मोठ्या प्रमाणात धोक्यात आल्याचे चित्र या परिसरात दिसून येते.
अशा प्रकारे बिबट्याचा वाढता संचार, होणारे हल्ले यामुळे शेतात काम करणारे शेतमजूर, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येते. या वाढत्या घटनांबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे असून तांत्रिक पद्धतीने बिबटे जेरबंद करणे गरजेचे आहे. तसेच मागील वर्षभरापासून अनेकदा वर्तमानपत्रातून वृत्त प्रसिद्ध होऊनही वनविभागाने या बिबट प्रवण क्षेत्रात उपाययोजनात्मक बोर्ड लावल्याचे निदर्शनास येत नाही. तसेच होणारे हल्ले टाळण्यासाठी अद्यापही गावांमध्ये जाऊन जनजागृती केली जात नसल्याचे दिसून येते.
याआधी झालेल्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता संबंधित भागांची वनविभागाने पाहणी करून पिंजरे लावणे गरजेचे आहे. पिंजऱ्यांची संख्या वाढवून योग्य वेळीच बिबटे जेरबंद झाल्यास होणाऱ्या अनेक दुर्घटना टाळण्यास मदत होईल. अशी मागणी बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे.